- अकरा दिवसांत तब्बल ५ हजारांपेक्षा अधिक हरकती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जुलै २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरातील दोन लाखापेक्षा अधिक मतदारांची नावे शेजारच्या प्रभागाच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांसह माजी नगरसेवक व इच्छुकांनी हरकती नोंदविल्या आहेत. अकरा दिवसांत तब्बल ५ हजारांपेक्षा अधिक हरकती महापालिकेच्या निवडणूक विभागात जमा झाल्या आहेत. येत्या ४ दिवसांत प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन मतदारांची पडताळणी करण्यासाठी प्रशासनाची कसोटी लागणार आहे. अंतिम यादी शनिवारी (दि. ९) प्रसिद्ध केली जाणार आहे.
पालिकेने प्रारूप १ ते ४६ प्रभागनिहाय मतदार यादी २३ जूनला प्रसिद्ध केली. त्यानंतर प्रभागातील अनेक मतदारांची नावे आजूबाजूच्या प्रभागात नोंदविल्याच्या तक्रारी सुरू झाल्या. यादीतील घोळावर शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, भाजपच्या आमदार उमा खापरे, शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले तसेच, माजी नगरसेवक व इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. त्यामुळे हरकती स्वीकारण्यास दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली.
माजी नगरसेवक, पदाधिकारी राजकीय व इच्छुकांनी ५०० ते २ हजार मतदारांच्या यादीसह हरकती नोंदविल्या आहेत. अखेरच्या दिवशी सायंकाळी साडेसहापर्यंत हरकती घेण्याचे काम सुरू होते. त्यासाठी इच्छुकांसाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती.