न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०२२) :- नागरिकांची सोय व्हावी यासाठी उभारण्यात आलेल्या शौचालयाची अज्ञात व्यक्तीने जाळपोळ केली. ही घटना सोमवारी (दि. ४) पहाटे उघडकीस आली.
आसपासच्या व्यावसायिकांची आणि नागरिकांची सोय व्हावी, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरात ठिकठिकाणी फायबरची शौचालये उभारली आहेत. हे शौचालय गुरुद्वारा चौक, वाल्हेकवाडी, चिंचवड येथील रेल्वे बोगद्याजवळ महापालिकेने उभारले आहे. मात्र या शौचालयास अज्ञात व्यक्तीने पहाटे सव्वाचार वाजताच्या सुमारास आग लावली.
सार्वजनिक शौचालयास आग लागल्याची वर्दी नागरिकाने अग्निशामक दलास दिली. त्यानुसार अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी त्वरीत ही आग पूर्णपणे विझविली. मात्र तोपर्यंत अर्धे शौचालय जळून खाक झाले होते.