न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२२) :- चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संलग्न प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कॉम्प्युटर स्टडीजला राष्ट्रीय मुल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅशनल असेसमेंट अॅण्ड अॅक्रिडिएशन कौन्सिल-नॅक) द्वितीय मुल्यांकनात ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. शिक्षणाची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘नॅक’द्वारे तपासणी केली जाते.
नॅक मुल्यांकन प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापन, शिक्षण आणि मूल्यमापन, संशोधन, नवकल्पना, पायाभूत सुविधा आणि शिक्षण संसाधने, संस्थापक मुल्ये आणि सर्वोत्तम अवलंबलेली पद्धती या परिणामांचा विचार केला जातो. अभ्यासक्रम शिकविण्याची व शिकण्याची पद्धती, विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील सहभाग विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या नोकर्या त्यांनी सुरु केलेले व्यवसाय व विद्यार्थ्यांच्या अंगीभूत सुप्त कलागुणांचा विकास या अनुषंगाने राबविण्यात आलेले सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक चर्चा सत्रे व उपक्रमे यांची कागदोपत्री पाहणी नॅक समितीचे अध्यक्ष डॉ. धरमजीत परमार (माजी कुलगुरु संतबाबा भागसिंग जालंधर विद्यापीठ, पंजाब) समन्वयक सदस्य डॉ. सुकांताकुमार बराल (इंदिरा गांधी राष्ट्रीय आदीवासी विद्यापीठ, मध्यप्रदेश येथील वाणिज्य विभागाचे प्राध्यापक) सहसमितीचे सदस्य डॉ. राजशेखर हिरेमठ (माजी प्राचार्य, के.एल.ई. सोसायटीचे निजलिंगप्पा महाविद्यायलय, बेंगलुरू) या त्रीसदस्यीय समितीने केली.
प्रतिभा महाविद्यालयाला मिळालेल्या ‘अ’श्रेणीच्या मानांकनाप्रित्यर्थ कमला एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षा प्रतिभा शहा, संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, समन्वयिका डॉ. जयश्री मुळे, मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया समवेत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक वर्गाचा कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
मार्गदर्शन करताना संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले, संस्थेला मिळालेले यश हे सर्वांचे सांघिक असून आपण दिलेला वेळ केलेले अथक परिश्रम, प्रत्येकाचेच योगदानामुळे मिळालेले फळ आहे. यासाठी आपण सर्वांनी सांघिक प्रयत्न केले. त्यामुळेच ‘अ’श्रेणीचे मानांकन मिळाला. विद्यार्थी अनुकरणीय आणि सतत नवीन गोष्टी शिकणारे असतात त्यांना फक्त प्रेरणा देणे गरजेचे असते. संस्था विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा व त्याच्या अंगीभूत असलेल्या कलागुणांचा त्यांच्या क्षेत्रात विकासासाठी सदैव प्रयत्नशील असते. वेगवेगळ्या उपक्रमात त्याचा सहभाग व शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी जे-जे आवश्यक आहे. त्यासाठी संस्था सदैव आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे, अशी आज आनंदाच्या समयी ग्वाही देतो. प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखे असते वेळोवेळी त्याची योग्य दखल घ्या, मानसन्मान द्या, असे आवाहन करून आनंदातून यापुढील वाटचाल करण्यासाठी संस्था व्यवस्थापन सदैव आपणासर्वांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही याप्रसंगी डॉ.दीपक शहा यांनी दिली.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया आदींनी मनोगत व्यक्त केले. सर्व मान्यवरांनी समन्वयिका डॉ. जयश्री मुळे व सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवकवर्गाचे विशेष कौतुक केले.
कौतुक सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार समन्वयिका डॉ. जयश्री मुळे यांनी मानले.