न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२२) :- दुर्मीळ किल्ड बॉक्स कासव वाकड पुलाजवळ सापडले. दुर्मीळ किल्ड बॉक्स कासव वाकड पुलाजवळ असल्याची माहिती नागरिकांनी बाणेरमधील सर्पमित्र अनिल कानसकर यांना दिली. त्यानंतर त्यांनी त्या कासवाला आपल्याकडे घेऊन ते सुरक्षितपणे राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.
दुर्मीळ जातीचे हे कासव असून जंगल परिसरातील नदी, तलावामध्ये व त्या परिसरात आढळते. कासव पूर्ण शाकाहारी असून झाडांची पाने व गवत, पडलेली फळे खातात. खाण्याकरिता, जादुटोणाकरिता या कासवाची शिकार केली जाते, त्यामुळे या कासवांची संख्या कमी झालेली आहे.
कासवाच्या वरच्या तपकिरी कवचाला तीन मोठे उंचावलेले कडे तर मागील टोकाला दाते असतात. कासवाची लांबी १५ ते १७ सेमी. असते. भारताव्यतिरिक्त चीन, ब्रह्मदेश, व्हिएतनाम, भूतान, थायलंड या देशात किल्ड बॉक्स कासव आढळते, अशी माहिती कानसकर यांनी दिली.