- नागरिकांच्या गुंठेवारी अर्जांवर कार्यवाही सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जुलै २०२२) :- गुंठेवारी विकास महाराष्ट्र अधिनियम २००१ अंतर्गत अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी पिंपरी – चिंचवड महापालिकेकडे अर्ज करण्याची मुदत ३० जूनला संपली आहे. अर्ज स्वीकृतीस आता मुदतवाढ दिली जाणार नाही, असे शहर अभियंता मकरंद निकम यांनी स्पष्ट केले. प्राप्त झालेल्या सुमारे १ हजार ३०० अर्जावर क्षेत्रीय कार्यालयानिहाय कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
पिंपरी – चिंचवड शहरातील ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम २००१ यामध्ये सुधारणा करून १२ मार्च २०२१ रोजी अधिनियम पारित केला आहे. त्या अनुषंगाने शहरातील ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी २० डिसेंबर २०२१ पासून अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्ज स्वीकृतीची दुसरी मुदतवाढ २० एप्रिलपर्यंत होती. तिसरी मुदतवाढ ३० जून २०२२ ला संपली आहे. पुणे महापालिकेप्रमाणे अर्ज स्वीकृतीस मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
तीन जूनपर्यंत प्राप्त झालेल्या १ हजार ३०० अर्जाचे वर्गीकरण करून ते क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांच्यावर क्षेत्रीय अधिकारी कार्यवाही करणार आहेत. योग्य असलेल्या बांधकामांना गुंठेवारीचे प्रमाणपत्र दिले जाईल. अर्जावर कार्यवाही पूर्ण होण्यास किमान ५ ते ६ महिन्यांचा कालावधी लागू शकतो, रेड झोन, बफर झोन, पूर रेषा, नदी पात्र, शेती झोन, आरक्षित जागेतील अनधिकृत बांधकाम असल्यात ते अर्ज फेटाळण्यात येतील, असे असे निकम यांनी सांगितले.