न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रु.) :- निगडी येथील विद्यानंद भवनच्या दीडशे छोट्या जवानांनी आज निगडी परिसरातून फेरी काढून, पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला.
शेकडो छोटे जवान, शिक्षक, पालकांनी सकाळीच शाळेच्या आवारात एकत्र येवून अमर जवान ज्योतीवर पुष्पचक्र अर्पण करून, श्रद्धांजली वाहण्यात आली. योगेश देवळे, साहेबराव जाधव, रुपाली जामोडकर, मारी मुदलियार यांची भावपूर्ण भाषणे झाली. त्यानंतर सर्व रॅलीत सहभागी झाले.
संपूर्ण निगडी परिसर विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या घोषणांनी जागा झाला. सहा किलोमीटर अंतर न थकता छोट्या मुलांनी पार केले. विशेष म्हणजे नागरिकांनी या रॅलीत सहभागी होवून, उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
‘शहीद जवान अमर रहे, जय जवान जय किसान’, या घोषणांनी निगडीत निषेध नोंदवला. सच्चिदानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भरत चव्हाण पाटील, प्रा डी. आर. करनुरे, विश्वस्त डॉ. जे. जी. पाटील, मुख्यध्यपिका छाया हब्बू, सविता किरंगे यांचे मार्गदर्शन लाभले.











