न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२२) :- पावसामुळे शहरातील बहुतांश भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनचालकांसह पादचारी वैतागले आहेत. खड्ड्यांबाबतच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन पालिकेने खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले आहे. शहरात १ हजार ११० खड्डे आढळून आले असून, त्यातील ८४६ खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
पावसाने हजेरी लावताच शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. अनेक रस्ते उखडले आहेत. त्या ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. तसेच, अनेक ठिकाणच्या रस्त्यांवरील पेव्हिंग ब्लॉक निखळले आहेत तर, काही ठिकाणी चेंबरचे झाकणे तुटले आहेत. त्यामुळे लहान – मोठे अपघात झाले होते.
तसेच, ड्रेनेज, सीसीटीव्ही कॅमेरे, विद्युत, स्मार्ट सिटी व इतर विभागाची कामे भरपावसात सुरू असल्याने रस्त्यांवर खड्डे निर्माण होऊन ते धोकादायक झाले होते. त्याची दखल घेत आयुक्त राजेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना रस्त्यांची पाहणी करण्याचे आदेश दिले होते.


















