न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०२२) :- स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली. प्रशासक राजेश पाटील यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये संपन्न झालेल्या बैठकीमध्ये सुमारे १४ कोटी रुपये खर्चाच्या विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीस विषयाशी संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.
प्रभाग क्र. ३२ मधील शिवदत्तनगर येथे जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यात येणार असून याकामी ४५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत पिंपळे सौदागर व रहाटणी परिसरात जलनि:सारण नलिका टाकण्यात येणार आहेत. याकामी २५ लाख रुपये खर्च होणार आहेत. प्रभाग क्र. १३ येथील सेक्टर क्र. २२ तसेच परिसरामध्ये जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी होणाऱ्या २५ लाख रुपये खर्चास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
अ आणि फ प्रभागांमध्ये मातीचे ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात येणार आहेत. तसेच त्या अनुषंगिक विदयुत व स्थापत्य विषयक कामे या ठिकाणी करण्यात येणार आहेत. याकामी ३ कोटी ६४ लाख रुपये खर्च होणार आहेत. शहरातील ओला व सुका कचरा संकलन करण्यासाठी टाटा एसीई हॉपर वाहने एक वर्ष कालावधीकरीता भाडेतत्वावर घेण्यात येणार असून त्याकरिता येणाऱ्या ९९ लाख रुपये खर्चास आज मान्यता देण्यात आली. ग प्रभागातील जलनि:सारण नलिकांची वार्षिक ठेकेदारी पद्धतीने साफसफाई आणि गाळ काढण्यासाठी १ कोटी २६ लाख रुपये खर्च होणार आहेत. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसाठी ओपन जीम तयार करण्यात येणार आहेत. याठिकाणी लागणारे आवश्यक जिम साहित्य खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ६६ लाख रुपये खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
हॉकी स्टेडीयम मधील हायमास्ट टॉवर दिव्यांचे वीजबचत अंतर्गत नूतनीकरण करण्यात येणार आहे. याकामी येणाऱ्या ५ कोटी ७५ लाख रुपये खर्चासह तरतूद वर्गीकरणाच्या विषयांना प्रशासक राजेश पाटील यांनी बैठकीत मान्यता दिली.