- आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्ते, मतदार रिचार्ज; हॉटेल व्यवसायिकांची चांदी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२२) :- आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माजी नगरसेवक तसेच अन्य इच्छुकांनी कार्यकर्त्यांचे संघटन वाढवित मोर्चे बांधणीस सुरुवात केली. त्यामुळे शहरात आखाड पार्ट्यांचा जोर वाढला होता. तो चांगलाच शिरजोर झाला होता. अनेकांनी एकत्रित येऊन सामिष जेवणाचा आनंद लुटला. आज गुरुवार असल्यामुळे खऱ्या अर्थाने आजच आखाडचा शेवट झाला आहे. उद्या शुक्रवारपासून श्रावण महिना सुरु होत आहे.
दरम्यान गटारी अमावस्यामुळे गेले काही दिवस नगरसेवक व अन्य इच्छुकांनी शहराबाहेरील हॉटेल्स, फार्म हाऊसवर कार्यकर्ते-नागरिकांसाठी आखाड़ जेवणावर भर दिला होता. या माध्यमातून मतांची मोट बांधण्यास सुरुवात झाली आहे. खऱ्या अर्थाने इच्छुकांकडून कार्यकर्ते, तसेच मतदारांना खूष ठेवण्यासाठी आणि राजकीय मंडळींनी राजकारणातील प्यादे आपलेसे करण्याची आखाडची संधी साधली. इच्छुकांनी तर आखाड पार्ट्यांवर लाखोंचा चुराडा केला आहे.
हॉटेल व्यावसायिकांनाही सुगीचे दिवस आले होते. जास्तीत जास्त ग्राहकांना बसण्याची व्यवस्था व्हावी यासाठी हॉटेलांमध्ये स्वतंत्र मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती. कामगारांची संख्याही वाढविली गेली होती. मोठ्या सोसायटीच्या ठिकाणी अशा जेवणाच्या सामूहिक आर्डरही दिल्या जात असल्याने केटरिंगचा व्यवसायही तेजीत होता. निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यापूर्वीच इच्छुकांनी आखाड पार्टीच्या निमित्ताने कार्यकर्ते संघटित करण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू केली आहे.