न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने आणि चिंचवड, इंदिरानगर येथील नव प्रगती मित्र मंडळाच्या सहकार्याने २९ ते ३१ जुलै दरम्यान जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रेमलोक पार्क येथील कै. सौ. मनीषा भोईर विरंगुळा केंद्रात सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत पुरुष, महिला व ज्येष्ठ नागरिक अशा तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. २ लाख ७ हजार ६०० रुपयांची बक्षीसे दिली जाणार आहेत. याबाबतची माहिती क्रीडा विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी दिली.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. जिल्हास्तर कॅरम स्पर्धा २०२२-२३ या स्पर्धेत पुरुष, महिला गट व ज्येष्ठ नागरिक गट असे एकूण ४०० खेळाडू सहभागी होणार आहे. विज्येत्या खेळाडूंना रोख बक्षीसे, ट्रॉफीज देण्यात येणार आहेत. पुरुष गटात प्रथम येणा-याला ३१ हजार, द्वितीय २५ हजार, तृतीय २० हजार रुपये, चतुर्थ क्रमांक १५ हजार रुपये, पाचवा, सहावा, सातवा, आठवा क्रमांक येणा-याला ७ हजार रुपये, ब्रेक टू फिनिश, ब्लॅक टू फिनिश अशी ३ हजार ६०० रुपयांची दोन बक्षिसे देण्यात येणार आहेत.
एकूण १ लाख २६ हजार २०० रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिक गटात प्रथम येणा-याला १५ हजार, द्वितीय ११ हजार, तृतीय ७ हजार, चतुर्थ ५ हजार आणि पाचवा, सहावा, सातवा, आठवा क्रमांक येणा-याला ३ हजार रुपये तर ब्रेक टू फिनिश, ब्लॅक टू फिनिश अशी ३ हजार ६०० रुपयांची दोन बक्षिसे अशी एकूण ५७ हजार २०० रुपयांची या गटाला बक्षीसे दिली जाणार आहेत. तर, महिला गटात प्रथम येणा-याला ७ हजार, द्वितीय ५ हजार, तृतीय ३ हजार, चतृर्थ २ हजार आणि ब्रेक टू फिनिश, ब्लॅक टू फिनिशची ३ हजार ६०० रुपयांची दोन बक्षिसे दिली जाणार आहेत. या गटात २४ हजार २०० रुपये तर तीनही गटातील विजेत्यांना २ लाख ७ हजार ६०० रुपयांची बक्षीसे दिली जाणार आहेत.