न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०२२) :- महापालिकेच्या वतीने नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी दर सोमवारी सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा होत असते. यासाठी मुख्य समन्वयक अधिका-यांची नेमणूक करून त्यांना जनसंवाद सभांचे अध्यक्षपद भूषवण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिलेले आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने समन्वय अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये बदल करण्यात आला असून त्याबाबतचे स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
उप आयुक्त तथा कायदा सल्लागार चंद्रकांत इंदलकर, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, स्थापत्य उद्यान विभागाचे सह शहर अभियंता सतीश इंगळे, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, शहर अभियंता मकरंद निकम, भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, आरोग्य विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर हे अनुक्रमे अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह, या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे मुख्य समन्वय अधिकारी म्हणून दि. १ ऑगस्ट २०२२ पासून कामकाज पाहणार आहेत.
महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा पदावधी संपल्यानंतर आयुक्त राजेश पाटील यांची शासनाने प्रशासक म्हणून नेमणूक केली. नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त पाटील यांनी जनसंवाद सभेचा उपक्रम सुरु केला आहे. दि. २१ मार्च २०२२ पासुन दर सोमवारी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा आयोजित करण्यात येते.
या जनसंवाद सभांमध्ये नागरिक आपले म्हणणे तसेच तक्रारवजा सूचना मांडत असतात. यातील बहुतांश तक्रारींचे निराकारण क्षेत्रीय स्तरावर तात्काळ करण्यात येते. धोरणात्मक बाबींसंदर्भात असलेल्या सूचनांवर धोरणात्मक निश्चितीकरीता कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. नागरिकांच्या सक्रीय सहभागामुळे जनसंवाद सभेचे उद्देश सफल होत आहे. तसेच या माध्यमातून नागरिक आणि प्रशासन यांच्यामधील सुसंवाद शहराच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरत असून नागरिक देखील याबद्दल समाधान व्यक्त करत आहेत.















