न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑगस्ट २०२२) :- भारतीय स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांचे योगदान महत्वपूर्ण असून ब्रिटीशांविरुध्द लढा देण्यासाठी त्यांनी उभारलेल्या संघटनेचे कार्य भारतीय इतिहासात अजरामर झाले आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती महापालिकेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले, उपआयुक्त रविकिरण घोडके, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, उपअभियंता विजय भोजने, माहिती व जनसंपर्क विभागाचे वासिम कुरेशी, देवेंद्र मोरे आदी उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त जगताप म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपले योगदान दिले. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ‘प्रतिसरकार’ स्थापन करुन ब्रिटीशांविरुध्द लढा दिला. प्रतिसरकारची स्थापना झाल्यावर ग्रामीण भागात ब्रिटिशांचे अस्तित्व नाममात्र राहिले. नाना पाटील यांनी युवकांची संघटना स्थापन करून इंग्रजांपुढे जबरदस्त आव्हान निर्माण केले. प्रतिसरकारचे नेते या नात्याने त्यांनी केलेल्या कार्यामुळेच त्यांना क्रांतिसिंह म्हणून ओळखले जाऊ लागले. महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीच्या भूमिगत कार्यकर्त्यांमध्ये नाना पाटलांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात थोर देशभक्तांना अभिवादन करताना त्यांना अभिप्रेत असणारा भारत घडविण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजे. देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे आणि त्यांच्या कार्याचे वेळोवेळी स्मरण करत राहिल्यास त्यांच्या कार्यातून भावी पिढीला त्याग आणि सेवाभाव याची प्रेरणा मिळत राहील असेही ते म्हणाले.















