न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२२) :- महापालिकेच्या अ, ब आणि क या क्षेत्रीय कार्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात एकूण ५८ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन रक्तदान केले.
केंद्र सरकार व राज्यशासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वतीने दि.८ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुषंगाने आज अ, ब आणि क क्षेत्रीय कार्यालयात सकाळी १० ते दुपारी २ या वेळात रक्तदान शिबीर पार पडले. यामध्ये अ क्षेत्रीय कार्यालयात १३, ब क्षेत्रीय कार्यालयात २५ आणि क क्षेत्रीय कार्यालयात २० अधिकारी कर्मचा-यांनी रक्तदान केले. यावेळी क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, अभिजित हराळे यांच्या सह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या रक्तकेंद्रा(रक्तपेढी) मार्फत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
दि.१० ऑगस्ट २०२२ रोजी ‘ड’ आणि ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयात, दि.१२ ऑगस्ट २०२२ रोजी ‘फ’,’ग’ आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयात तर दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० या वेळेत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहीदांप्रति आपला आदरभाव व्यक्त करत स्वातंत्र्य चळवळीचा जागर करण्यासाठी, पिंपरी चिंचवड उद्योगनगरीला देशातील स्वच्छ, सुंदर, पर्यावरण पूरक आणि राहण्यासाठी सर्वार्थाने उत्तम शहर बनविण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन महापालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये घरोघरी तिरंगा, विशेष स्वच्छता मोहीम, प्लास्टिक मुक्त शहर मोहीम, रक्तदान शिबीर, ग्रंथोत्सव, व्याख्यानमाला, प्रभात फेरी अशा उपक्रमांचा समावेश आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.