न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑगस्ट २०२२) :- प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे एस पी ओ व पोलीस मित्र तसेच पर्यावरण मित्र हे पालिका तसेच पोलीस आयुक्तालयास सामाजिक उपक्रमांमध्ये सहकार्य करत आहेत. ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेतही समितीचे पोलीस मित्र सहभागी आहेत. अश्या ५० समिती पोलीस मित्र सदस्यांचा तळवडे वाहतूक विभागामध्ये आज “कर्तव्यदक्ष पोलीस मित्र” सुवर्ण पदक देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे २५ कर्तव्यदक्ष नागरिकांनाही पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख उपस्थिती तळवडे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे, समिती राज्य अध्यक्ष विजय पाटील, संपर्क प्रमुख विजय मुनोत, विभागीय अध्यक्ष विशाल शेवाळे,सतीश देशमुख, संतोष चव्हाण, शशिकांत इंगळे, बाबासाहेब घाळी, गौरी सरोदे, विभावरी इंगळे, सतीश मांडवे, नितीन मांडवे यांची होती.
या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे म्हणाले,” देहू पालखी, सार्वजनिक गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र, रात्र गस्त, विधिसंघर्षित बालक समुपदेशन, वृक्षारोपण अश्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे पोलिस मित्र, एस पी ओ सहभागी होऊन प्रशासनास मदत करत असतात. त्यांच्या सहकार्याने पोलीस विभागास अतिरिक्त मनुष्यबळ मिळत असते. सामाजिक सलोखा राखण्यासही त्यांचे सहकार्य मिळत असते. मी स्वतः पोलीस प्रशासनाच्या वतीने १० वर्षांपासून यांचे सोबत सार्वजनिक सामाजिक कार्यक्रमात सहभागी होत आलो आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अश्या कर्तव्यदक्ष पोलीस मित्रांचा सन्मान करताना आनंद होत आहे.”
निगडी – तळवडे विभागिय अध्यक्ष विशाल शेवाळे म्हणाले,”प्राधिकरण सुरक्षा समिती शहरातील नागरिकांच्या सुरक्षेकरिता कटिबद्ध आहे. शहरातील वाहतूक समस्या वाढत्या वाहन संख्येमुळे बिकट होत चालली आहे. त्यामुळे निगडी, तळवडे, चिंचवड, पिंपरी, भोसरी या प्रमुख वाहतूक विभागांवर मोठा अतिरिक्त ताणही पडत आहे, समितीचे वाहतूक पोलीस मित्र याकरिता पालिका व पोलिस प्रशासनास तत्परतेने सहकार्य करत आहेत.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरीष्ठ निरीक्षक डॉ.अमरनाथ वाघमोडे यांनी केले. सूत्रसंचालन सतीश देशमुख यांनी केले. आभार प्रदर्शन समिती अध्यक्ष विजय पाटील यांनी केले.












