न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२२) :- शिरगाव परंदवाडी येथे रविवारी (दि. १४) सांयकाळी पावणे पाचच्या दरम्यान पोलीस कर्मचारी त्यांची चारचाकी गाडी घेऊन सोमाटणे फाट्याकडे जात असताना उड्डाणपुलावर आधीच दबा धरून बसलेल्या तिघांपैकी एकजण अचानक गाडी समोर आडवा पडला. पोलिसाने वेळीच ब्रेक दाबला व गाडी थांबविली. आरोपींना हटकले व असे करण्यास मनाई केली.
आरोपींनी ” तू पोलीस असला म्हणून काय झाले. आमची आत्महत्येची पैज लागली आहे. तू जा इथून आमचे आम्ही बघून घेऊ” असे म्हणत हुज्जत घातली. आरोपींनी पोलिसाला शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसाने कर्मचा-यांना बोलावून घेतले व आरोपींना अटक केली.
आरोपींवर आत्महत्येचा प्रयत्न करणे व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असून अजय भगवान पंडागळे (वय ४० रा. देहुरोड), सचिन चंद्रकांत माने (वय २४ रा. पिंपरी) व योगेश शिवाजी कांबळे (वय २७, रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शिरगाव-परंदवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.












