- महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची विकेट भाजपच्या विरोधामुळे?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२२) :- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्याचे पडसाद आता पिंपरी चिंचवड महापालिकेत उमटायला सुरुवात झाली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांची बदली होणार असल्याची जोरदार चर्चा अखेर खरी ठरली. त्यांची मंगळवारी तडकाफडकी बदली झाली आहे. त्यांच्या जागी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची आयुक्तपदी बदली झाली आहे.
ओडिशा केडरचे २००५ च्या बॅचचे आयएएस राजेश पाटील यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्तपदी १५ फेब्रुवारी २०२१ रोजी नियुक्ती झाली होती. पाटील प्रतिनियुक्तीने ५ वर्षांसाठी महाराष्ट्रात आले आहेत. आयुक्त पाटील रुजू झाले तेव्हा महापालिकेत भाजपची सत्ता होती. त्यांना तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पाठविले होते. त्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांशी आयुक्तांना जुळवून घेण्यास वेळ लागला. सुरुवातीला आयुक्त पाटील यांच्या कार्यपद्धतीवरून नगरसेवकांमध्ये वारंवार खटके उडाले होते. नगरसेवकांचा कार्यकाळ १३ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने आयुक्त पाटील यांचीच प्रशासकपदी नियुक्ती केली. त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रवादीधार्जिने आयुक्त अशी टीकाही झाली होती.
आता राज्यात भाजपच्या टेकून एकनाथ शिंदे यांचे सरकार आले आहे. मंत्रीमंडळ विस्तारानंतर प्रशासकीय अनुकुलता लक्षात घेत शिंदे आणि भाजप जोडगोळीने कारभार करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पहिल्याच झटक्यात पिंपरी चिंचवड शहरात भाजपला कारभारापासून दूर ठेवणारे आयुक्त राजेश पाटील यांची त्यांनी विकेट काढली आहे. शिवाय पाटील यांना त्यांचाच मनमर्जी कारभार नडला. महापालिकेतील उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजाचे आयुक्त पाटील यांनी वारंवार फेरवाटप केले. प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना महत्वाचे विभाग देऊन स्थानिक अधिकाऱ्यांना डावल्याचाही आरोप त्यांच्यावर होत होता. तसेच मोशीतील कचरा डेपोच्या आगीचा अहवाल, श्वान नसबंदी शस्त्रक्रिया अहवाल, अद्यापही गुलदस्त्यात आहे. केवळ स्वच्छता अभियान, रंगरंगोटी, सुशोभीकरण अशा कामावर भर देऊन प्रसिध्दी मिळविल्याचा आरोप पाटील यांच्यावर झाले आहेत. आयुक्त पाटील यांच्या विविध तक्रारी नवीन सरकारकडे गेल्या. प्रतिनियुक्तीवर महापालिकेत आलेल्या सहाय्यक आयुक्त, उपायुक्तांची संख्या दोनने जास्त झाली आहे. उपायुक्त पदासाठी एकूण १० पदे मंजूर आहेत, त्यापैकी राज्य शासनाकडून ५ पदांची नियुक्ती अपेक्षित होती. ७ पदे नियुक्त केली आहेत. सह शहर अभियंता पदासाठी शासन प्रतिनियुक्तीची तरतूद नाही, असे असतानाही १ अधिकारी नियुक्त केला आहे. आयुक्तांनी प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांकडे महत्वाचे विभाग सोपविले होते. आता आयुक्तांच्या अचानक बदलीने अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजेश पाटील यांच्या पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्तपदासाठी शिवसेनेच्या तात्कालीन एका मंत्र्याने मोठी ताकद लावली होती. त्यासाठी जळगाव कनेक्शनही वापरण्यात आले होते. आता हा मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याने शिंदे गट राजेश पाटील यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले जात होते. भाजपचा विरोध झाल्यानेच शिंदे गटाने दबावाखाली येऊन आयुक्तांची बदली केली, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरु आहे.












