न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रु.) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सदस्य तथा शिवसेना गटनेते राहूल कलाटे व महानगरपालिकेतील उपअभियंता अनिल राऊत यांनी परस्परांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. याबाबत गुन्हा अदखलपात्र नोंदला गेला आहे. त्यातच सभेत महापालिकेच्या अधिका-यांनी नगरसेवकांना चोपून काढा, असे वक्तव्य केले आहे. याचा नगरसेवकांनी विरोध केला असून, लोकप्रतिनिधींबाबत अशी मग्रुरीची भाषा वापरणाऱ्यावर कारवाई करण्याची नगरसेवकांनी पोलिस आयुक्त आर. के. पद्यनाभन यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, गटनेते राहुल कलाटे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे आणि शिवीगाळ करुन मारहाण करणे याबाबत महापालिकेचे उपअभियंता अनिल राऊत यांनी गुन्हा दाखल केला आहे. परंतू, सदरचा गुन्हा अदखलपात्र नोंदविला गेला आहे. तसेच अनिल राऊत यांच्या विरोधातही राहूल कलाटे यांचे कार्यकर्ते कामठे यांनी खंडणी मागितलेबाबतचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे तो गुन्हा अदखलपात्र दाखल केला आहे. वस्तूत: तो गुन्हा दखलपात्र गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे.
त्यातच महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारात अनिल राऊत यांना मारहाण झाल्याबाबत निषेध सभा झाली. त्या सभेत महापालिकेच्या अधिका-यांनी नगरसेवकांना चोपून काढा, असे वक्तव्य केले आहे. या अधिका-यावर तात्काळ दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच कामठे यांंनी अनिल राऊत यांच्या विरोधात दाखल केलेला गुन्हा दखलपात्र म्हणून नोंदविण्यात यावा, असे पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
या पत्रावर विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक राजू बनसोडे, पोर्णिमा सोनवणे, मिनल यादव, रेखा दर्शिले, आश्विनी वाघमारे, मोरेश्वर भोंडवे, नवनाथ जगताप, सचिन भोसले, सचिन चिखले, संदीप वाघेरे, राजू मिसाळ, शैलेश मोरे, कैलास बारणे, विक्रांत लांडे, शाम लांडे, प्रवीण भालेकर, अमित गावडे, निलेश बारणे आदी नगरसेवकांच्या सह्या आहेत.










