- पाच व दहा रुपयांचा कॉईन किंवा गुगल पे ही चालेल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२२) :- शहरातील नागरिकांना प्लास्टिक पिशव्यांना पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने कापडी पिशव्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी शहरामध्ये ३२ ठिकाणी व्हेंडिंग मशीन लावण्यात येणार आहेत. यामध्ये पाच व दहा रुपयांचा कॉईन टाकल्यावर कापडी पिशवी मिळणार आहे.
शहरामध्ये प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू आहे. त्यासोबतच नागरिकांना कापडी व पर्यावरणपूरक पिशव्या वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. आरोग्य विभागाच्या वतीने कचऱ्याचे विलगीकरण केले जाते. त्यामधील कापड वेगळे करण्यात येणार आहे. नागरिकांनाही घरातील जुने कपडे घंटागाडी कर्मचाऱ्यांकडे देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. व्हेंडिंग मशीनवर क्युआर कोड देखील लावण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना फोन पे, गुगल पेद्वारे पैसे पटवून कापडी पिशवी मशीनमधून घेता येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभाग कामाला लागला आहे.
शहर स्वच्छतेसाठी शहरामध्ये प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. त्याची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी नागरिकांना पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. त्यासाठी कापडी पिशव्या नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. त्यानुसार शहरामध्ये ३२ ठिकाणी व्हेंडिंग मशीन लावण्यात येणार आहे. पुढे याची संख्या शंभर करण्यात येणार आहे.
– अजय चारठणकर, उपायुक्त, आरोग्य विभाग…