न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२२) :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशभरात दि. १३ ते दि. १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी महापालिकेने तीन लाख राष्ट्रध्वज खरेदी केले होते. तर शासनाकडून १ लाख असे चार लाख ध्वज महापालिकेला उपलब्ध झाले होते.
यामधील निकृष्ट आणि काही कारणांमुळे ८० हजार राष्ट्रध्वज महापालिकेकडे शिल्लक आहेत. हे ध्वज राज्य शासनाला परत पाठविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर आझादी का महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील नागरिकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वज उपलब्ध होणार नाही. म्हणून महापालिकेने निविदा प्रसिध्द करून राष्ट्रध्वजाची ठेकेदारामार्फत तीन लाख ध्वज खरेदी करून आलेल्या किंमतीत नागरिकांना विकले. राज्य शासनाकडून १ लाख ध्वज महापालिकेला मिळाले होते. यामधील बहुतांशी ध्वज निकृष्ट दर्जाचे होते. त्यामुळे ७९ हजार ७७८ राष्ट्रध्वज नागरिकांना विकता आले नाहीत. हे ध्वज परत करणार आहे.
















