- मतदारांना कसे सामोरे जायचे?
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रु.) :- शिवसेना आणि भाजप यांच्यात अखेर युती झाली. दोन्ही पक्षांनी तलवारी म्यान करीत गळ्यात गळे घालत, आगामी लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढण्याची घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत केली. गेले ५ वर्ष दोन्ही पक्षांनी एकमेकांना वाक्यबाणांनी घायाळ केले होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्याच भाषेत सांगायचे झाले, तर आता २०१९ आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभेसाठी शिवसेनेने कमळाबाईचा हात हातात घेतला आहे. लोकसभेसाठी शिवसेना २३ जागांवर लढेल तर भाजप २५ जगांवर लढेल. तर विधानसभेसाठी ५०-५० (१४४-१४४) फॉर्म्युला ठरला आहे.
पत्रकार परिषदेत मुख्यमत्र्यांनी काही मुद्यांवर दोघांमध्ये मतभेद झाले. पण, दोघांमधील हिंदूत्वाचा समान दुवा असल्याने एकत्र आलो. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना आग्रही होती. त्यामुळे भाजपने पीकविम्याची प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच नाणार प्रकल्पाची जागा बदलण्याची घोषणा केली. या प्रकल्पाला शिवसेनेने तीव्र विरोध केला होता. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वांनी कंबर कसली आहे. मात्र, पिंपरी चिंचवड शहरात या युतीचे पडसाद काय पडतील? कार्यकर्त्यांच्या भावनेचे काय? गेल्या साडेचार वर्षात ज्यांच्यात विस्तवही जात नव्हता. आज असे काय घडले की शिवसेना युतीसाठी राजी झाली? याचे सर्वसामन्यांना कोडे पडल्याशिवाय राहणार नाही.
भले उद्धव ठाकरे व भाजप एकत्र आले असोत, परंतु, मागील कालावधीमध्ये शहर शिवसेनेने सत्ताधारी भाजपच्या प्रत्येक चुकीच्या निर्णयावरून आंदोलन उभे केले आहे. पिंपरी चिंचवड शहरात सत्ताधारी भाजपच्या अनेक वादग्रस्त निर्णयावरून सेना-भाजप प्रत्यक्ष हमरीतुमरीवर आलेत. सत्ताधाऱ्यांच्या काही शिलेदारांनी सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना पून्हा सेनेने मावळ लोकसभेची उमेदवारी दिली, तर त्यांचे काम करणार नसल्याचे गडकरी यांची नुकतीच भेट घेऊन आपला निर्णय कळविला आहे. आता युती तर झाली. परंतु, मावळ लोकसभा परत सेनेकडे गेली व सेनेने खासदार बारणे यांना परत उमेदवारी दिली तर? भाजप कार्यकर्ते आपला मनमुटाव कसा दूर करणार?
राज्यात आणि केंद्रात सत्तेत असतानाही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रश्नांवर सत्ताधारी भाजपवर विरोधी पक्षांपेक्षा विखारी टीका केली आहे. तर भाजपनेही शिवसेनेवर टीका करताना खालची पातळी गाठली होती. काही दिवसांपूर्वी एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणारे हे दोन पक्ष आता एकत्र येत प्रचार करणार आहेत. मतदारांपुढे कोणत्या तोंडाने मत मागायचे. या निर्णयामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात पडण्याची शक्यताच जास्त आहे.











