- महावितरणचा कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात; भोसरीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२२) :- कंपनीतील वीज मीटर कनेक्शन बंद करण्यासाठी ५० हजारांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवार (दि. २४) भोसरी येथे ही कारवाई केली.
संतोषकुमार बाळासाहेब गित्ते (वय ३१) असे अटक केलेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी ७९ वर्षीय पीडित व्यक्तीने तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची एमआयडीसी भोसरी परिसरात कंपनी आहे. दरम्यान, या कंपनीतील विद्युत मीटरचे वीज कनेक्शन बंद करण्यासाठी त्यांनी महावितरणच्या भोसरी उपविभाग कार्यालयात अर्ज दिला.
आरोपी गित्ते हा या कार्यालयात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहे. आरोपीने तक्रारदार यांच्या कंपनीतील वीज कनेक्शन बंद करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार, एसीबीने तीन दिवस सापळा रचला. गित्ते हा दोषी आढळल्याने बुधवारी एसीबीने त्याला ताब्यात घेतले. याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक वीरनाथ माने तपास करीत आहेत.
















