- मंडप उभारणीसह जाहिरात शुल्कही पूर्णपणे माफ; आयुक्तांचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑगस्ट २०२२) : – गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेश मंडळ, हाऊसिंग सोसायटी आणि घरगुती उत्सवासाठी गणेश मूर्तीच्या उंचीची मर्यादा हटविण्यात आली आहे. त्यामुळे मंडळ, सोसायटी आणि घरात कितीही उंच मूर्ती बसविता येणार आहे. त्या संदर्भात पिंपरी – चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी बुधवारी (दि. २४) आदेश पारित केला आहे.
राज्य शासनाने गणेशोत्सव २०२२ साठी सुधारित मार्गदर्शिका २१ जुलैच्या बैठकीत प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार शहरासाठी तो निर्णय लागू केला आहे. पालिका प्रशासनाने पिंपरी – चिंचवड मूर्तीच्या उंचीबाबतची मर्यादा हटविण्यात आल्याने गणेश मंडळासह नागरिकांना आपल्या आवडीनुसार कितीही उंचीची गणेश मूर्ती बसविता येणार आहे. तसेच मंडळाच्या मंडपासाठी प्रति चौरस फूट ५० रूपये शुल्क पालिकेकडून घेतले जाते होते. ते शुल्क यंदाच्या गणेशोत्सवासाठी पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.
त्यामुळे पालिका परवाना देताना कोणतेही शुल्क आकारणार नाही. गणेशोत्सवाकरीता महापालिकेडून आकारण्यात येणारे जाहिरात शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. मंडप उभारणीसाठी उद्यान, भूमि आणि जिंदगी आणि खासगी जागेवर आकारण्यात येणारे शुल्कही माफ करण्यात आले आहे. मात्र, शासनाच्या अटी व शर्तीचे पालन करणे आवश्यक आहे, असे आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.















