न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑगस्ट २०२२) : – आकुर्डी, दळवीनगर येथील पाचजण मित्र कुंडमळा येथे फिरायला आले होते. त्यापैकी एकजण पाय घसरून इंद्रायणी नदीपात्रात पडला. त्याला वाचविण्यासाठी त्याच्या मित्राने पाण्यात उडी मारली. परंतु, पुरामुळे प्रवाहास अतिवेग असल्याने मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात तो प्रवाहात वाहून गेला.
मात्र प्रथम पाण्यात पडलेला मित्र अपराज नजीर शेख (वय १९) यास कुंडजाई माता मित्र मंडळाचे स्थानिक युवकांनी जीव धोक्यात घालून वाचविले. परंतु त्याला वाचविणारा मित्र मात्र पाण्यात वाहून गेला. हा प्रकार गुरुवारी (दि. २५) रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास घडला. राजकुमार रामब्रीज जैस्वाल (वय १८) या वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न वन्यजीव रक्षक पथक मावळ व शिवदुर्ग पथक लोणावळा करीत आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
कुंडमळ्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु पुराच्या पाण्यामुळे नदीपात्रातील खडकातील रांजणखळगे, खाचखळगे, घळया यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे इथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. जुलै व ऑगष्ट या दोन महिन्यात पाण्यात पडणाऱ्यांची संख्या १० झाली असून पैकी ७ जणांना वाचविण्यात यश मिळाले आहे. तर, तिघांना प्राण गमवावे लागले आहेत. हे तिघेही आकुर्डी येथीलच रहिवासी होते. वारंवार होणाऱ्या अपघातांची गांभिर्याने दखल घेऊन सुरक्षिततेचा कायमस्वरूपी बंदोबस्त पोलिस ठाण्याकडून व्हावा, अशी मागणी होत आहे.
दरम्यान राजकुमार जयस्वाल याचा मृतदेह आज दुपारी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या पथकाने शोधून काढला. विद्यार्थ्याचा मृतदेह नदी किनारी एका झाडाच्या खोडात अडकलेला दिसला. तो मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक केंद्राकडे पाठवला. त्यानंतर तो नातेवाईकांना देण्यात आला.















