- निगडी परिमंडळ विभागाचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२२) :- उच्च उत्पन्न गटात मोडणाऱ्या नागरिकांनी आपला स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या वस्तूंवरील हक्क सोडावा, यासाठी शासनाकडून त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती; परंतु आता ही मुदत वाढवून १५ सप्टेंबर करण्यात आली आहे.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावे चारचाकी गाडी आहे, घरात वातानुकूलित यंत्रणा आहे, कुटुंबातील सदस्यांपैकी कोणाचे घर अथवा शेती आहे, सदस्यांपैकी कोणी व्यक्ती खासगी अथवा सरकारी नोकरीतअसल्यास, कुटुंबातील सदस्यांपैकी कोणी सरकारी पेन्शनचा लाभ घेत असल्यास, सदस्यांपैकी कोणी परदेश यात्रा केली असल्यास त्यांनी अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेऊ नये.
खोटी माहिती देऊन रेशनवरील धान्य घेत असल्यास संबंधितांकडून घेतलेल्या मालाची किंमत गहू २४ रुपये प्रमाणे, तर तांदूळ ३२ रुपये प्रमाणे वसूल करण्यात येईल; तसेच शासनाची फसवणूक केल्याबद्दल कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा निगडी परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांनी दिला आहे.
सरकारी व खासगी नोकरी तसेच ज्याचे उत्पन्न ५९ हजार पेक्षा जास्त आहे. अशा व्यक्तींचे धान्य बंद करण्यात येणार आहे. जे नागरिक बंद करणार नाहीत, त्यांच्यावर धान्य बाजारभाव मूल्याप्रमाणे वसुली करण्यात येणार आहे. शिवाय, केंद्र शासनाची फसवणूक केल्यास कारवाईदेखील करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवडमधील रेशनधारकांनी याची नोंद घेणे आवश्यक आहे. अद्यापपर्यंत कारवाई सुरु न झाल्याने पिंपरी-चिंचवडमधील केवळ ४२२ जणांनी अन्नधान्याचा लाभ सोडला आहे. याची नोंद निगडी व भोसरी अन्नधान्य पुरवठा परिमंडळ कार्यालयाकडे झाली आहे.















