न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नाशिक : भाजप आघाडीतून वेगळे झालेले खासदार राजू शेट्टी काँग्रेस आघाडीसोबत जाणार का? याविषयी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सध्या विचारमंथन सुरु आहे. नाशिकमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यावर रात्रभर खल झाला. त्यातुन सहा विधानसभा व नाशिक लोकसभा मतदारसंघात अनुकुल वातावरण आहे. त्यामुळे नाशिकच्या पारंपारीक राजकीय स्पर्धकांत एक नवा भिडू जोडला जातो, की आघाडीचा भाग बनतो याची उत्सुकता आहे.
आतापर्यंत सर्वच निवडणुकांत नाशिकमध्ये शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांतच पारंपारीक राजकीय लढाई होत होती. तिला राज ठाकरे यांच्या ‘मनसे’ कडून छेद देण्यात आला. गेल्या काही निवडणुकांत मनसे प्रमुख स्पर्धक राहिला आहे. मात्र, गत महापालिका व विधानसभा, लोकसभा निवडणुकांत मनसेला लक्षणीय प्रतिसाद मिळाला नव्हता. आता त्यात खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेने चाचपणी सुरु केल्याने ते मनसेची जागा घेणार काय? याची उत्सुकता आहे.
नाशिक जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यात ही बैठक झाली. यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी महत्वाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गोपनीय बैठक झाली. बैठकीत आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. कोणत्या मतदारसंघात पक्ष भक्कमपणे लढू शकतो यावर पहाटेपर्यंत मंथन झाले. या चर्चेमध्ये निफाड, चांदवड, सिन्नर, दिंडोरी, सटाणा, नांदगाव विधानसभा आणि नाशिक लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करा; या मतदारसघांत आगामी निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करा, अशा सूचना खासदार राजू शेट्टी यांनी दिल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते संदीप जगताप यांनी न्यूज पीसीएमसी ला दिली.
नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची पक्षाची तयारी आहे. त्यासाठी चाचपणी सुरु आहे. शहरातील विविध चळवळी, आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सतत सक्रीय व आक्रमक भूमिका घेतली आहे. ग्रामीण भागात संघटनेला व खासदार शेट्टी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. याचा फायदा निश्चित होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आता त्यासाठी उमेदवारांचा शोध सुरु केला आहे. मात्र त्यात निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे.
















