न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२२) :- केळगाव येथील सिद्धबेट जवळ इंद्रायणी नदीच्या पुलावर फिर्यादी बुधवारी सकाळी साडेसात वाजता आले असता अनोळखी पाच जणांनी त्यांना कारमध्ये जबरदस्तीने बसवून अपहरण केले.
फिर्यादींना भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या पाठीमागे मोकळ्या मैदानात आणून त्यांना जबरदस्तीने बसवून ठेवले. अपहरण करणाऱ्या आरोपींनी फिर्यादी यांचे मामा याला फोन केला. तासाभराने फिर्यादीचा मामा आणि चुलत मामा तिथे आले.
त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत, तुझ्या बापाला लै माज आलाय का, तो दुसरे लग्न कसे करतो तेच आम्ही बघतो अशी दमदाटी करत लाकडी काठीने पाठीवर, हातावर, पायावर बेदम मारहाण केली. यात फिर्यादीचा पाय फ्रॅक्चर झाला. दत्तात्रय तुकाराम ढेरंगे, अशोक रंभाजी ढेरंगे (रा. गुळाणी, ता. खेड) आणि त्यांचे पाच साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी दत्तात्रय यांच्या भाच्याने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.
















