न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२२) :- “गदिमा हे महाकवी होते. जीवनात जे अनुभवले ते त्यांनी आपल्या कवितांमधून उत्कटतेने मांडले!” असे गौरवोद्गार ज्येष्ठ कवी प्रा. फ. मुं. शिंदे यांनी श्रीराम विद्यामंदिर, चक्रपाणी वसाहत, रामनगर, भोसरी येथे शनिवार, दिनांक ०१ ऑक्टोबर २०२२ रोजी काढले.
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद – भोसरी शाखा आणि गदिमा कुटुंबीय आयोजित तिसाव्या राज्यस्तरीय कवितामहोत्सवात पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते प्रा. फ. मुं. शिंदे यांना गदिमा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. कविवर्य रामदास फुटाणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. स्वागताध्यक्ष सुदाम भोरे, त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकर गुळवे, प्रकाशक डॉ. दीपक चांदणे, महाराष्ट्र साहित्य परिषद – भोसरी शाखा उपाध्यक्ष अरुण इंगळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती; तसेच साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती. श्रीरामपूरचे आमदार कविवर्य लहू कानडे (गदिमा काव्यप्रतिभा पुरस्कार), चौघडावादक रमेश पाचंगे (गदिमा कलागौरव पुरस्कार) यांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातल्या विविध भागातील कवींना गदिमा साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आलेत.
त्यामध्ये डॉ. पल्लवी बनसोडे, वसई (देहमूठ), प्रशांत पोरे, चिंचवड (दीवान-ए-प्रशांत), डी. के. शेख, उस्मानाबाद (बघू नका मुखडा वळू वळू), जितेंद्र लाड, नवी मुंबई (माझ्या जगण्याचं बळ), भाग्यश्री केसकर, उस्मानाबाद (उन्हानं बांधलं सावलीचं घर), आनंदिता, मुंबई (पुसट रेषेच्या आतबाहेर) यांचा समावेश होता; तर मृत्युंजय साहित्य पुरस्कार औरंगाबाद येथील रमेश रावळकर (टिश्यू पेपर) यांच्या कादंबरीला प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर गदिमा काव्यस्पर्धेतील दत्तात्रय खंडागळे (प्रथम), शामराव सरकाळे (द्वितीय) आणि गजानन निमकर्डे (तृतीय) या विजेत्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पुरुषोत्तम सदाफुले लिखित ‘उजेडाचे मळे’ या ललितलेखसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
‘गदिमांचे वारसदार’ या कविसंमेलनात सर्व पुरस्कारार्थी कवींसह अरुण पवार, गणेश आघाव, अस्मिता चांदणे या कवींनी आपल्या वैविध्यपूर्ण कवितांच्या प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पोपटराव पवार यांनी आपल्या मनोगतातून, “गदिमांनी आपल्या कवितांमधून रामराज्य निर्माण केले; तर फ. मुं. शिंदे यांच्या कवितांनी जीवनात खूप आनंद दिला!” अशा भावना व्यक्त केल्या. लहू कानडे यांनी, “राजकारणाकडे गंभीरपणे पाहिले पाहिजे हे कवींनी समाजात रुजवावे!” अशी अपेक्षा व्यक्त केली. रामदास फुटाणे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “सरकार वेगाने सार्वजनिक मालमत्तांचे खाजगीकरण करत असून गुवाहाटीचा खर्च भरून काढण्यासाठी हे चालले आहे का, असे वाटते!” अशी टिप्पणी करीत “मी पुन्हा येईन!” ही सांकेतिक कविता सादर करून “माणसातील ईश्वराचा शोध घ्या!” असे आवाहन केले. “एक धागा सुखाचा…” या गदिमागीताचे राजेंद्र वाघ यांनी केलेल्या सादरीकरणाने सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविकातून गदिमा कवितामहोत्सवाच्या तीस वर्षे कालावधीच्या आठवणी कथन केल्या. मानसी चिटणीस यांनी मानपत्राचे वाचन केले. पंचाहत्तर दिव्यांनी प्रा. फ. मुं. शिंदे यांना प्रा. लीला शिंदे यांच्यासह औक्षण करण्यात आले.
सुरेश कंक, वर्षा बालगोपाल, संगीता झिंजुरके यांच्यासह लायन्स क्लब भोजापूर गोल्ड, आशिया मानवशक्ती विकास संस्था, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, शब्दधन काव्यमंच आणि दिलासा संस्था यांनी संयोजनात सहकार्य केले. भरत दौंडकर यांनी कविसंमेलनाचे आणि प्रा. दिगंबर ढोकले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. बाजीराव सातपुते यांनी आभार मानले. ‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


















