- महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची प्रस्तावाला मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने माजी सैनिकांना मिळकत कर भरण्यासाठी ५० टक्के सवलत दिली जाते. त्याच पार्श्वभूमीवर आता दिव्यांगांनाही करामध्ये सवलत देण्यात येणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि. ४) महापालिका सभेमध्ये मान्यता दिली.
कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने शहरातील इमारत व जमिनीवर असलेल्या मालमत्तांवर कराची आकारणी व वसुली केली जाते. २० फेब्रुवारी २०१४ मध्ये ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या नावावर असलेल्या मालमत्तेस आर्थिक वर्षातील चालू मागणीतील सामान्य करात ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. मात्र, हा लाभ घ्यायचा असल्यास ३० जूनपूर्वी सवलतीची रक्कम वगळता थकबाकीसह संपूर्ण रक्कम भरणे आवश्यक आहे. त्यासाठी ३० जूनपर्यंत अंतिम मुदत होती.
नवीन मालमत्तांवर प्रथम कर आकारणी होऊन अशा मालमत्तांना प्रथम बिल देण्यात आले आहे. त्यांना चालू आर्थिक वर्षाच्या ज्या दिनांकास बिल संगणक प्रणालीमधून येईल त्या दिनांकापासून तीन महिन्याच्या आतमध्ये आगाऊ मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांसाठी सामान्य करात सवलत देण्यात येणार आहे. स्वतंत्र नोंद असलेल्या बिगरनिवासी वापराच्या मालमत्तेस सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये १० टक्के, २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये ५ टक्के सवलत देण्यात येणार आहे, तर बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक, मोकळ्या जमिनी आदी मालमत्ताधारकांना सन २०२२-२३ व २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये ५ टक्के सवलत देण्यात येणार आहे.
यापुढे दिव्यांग व्यक्तींना संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये कधीही या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या नावावर मालमत्ता असल्यास त्यांना या सवलतीचा फायदा घेता येणार आहे. त्यामध्ये अंध, दिव्यांग, मतिमंद, कर्णबधिर व मूकबधिर नागरिकांना या सवलतीचा फायदा घेता येणार आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षांपासून हे धोरण कायमस्वरूपी अमलात आणले जाणार आहे. त्यामुळे शहरातील दिव्यांगांना त्याचा फायदा होणार आहे. त्याला महापालिका सभेमध्ये आयुक्त सिंह यांनी मंजुरी दिली आहे.