- पिंपरी चिंचवड आरटीओच्या तिजोरीत सत्तर कोटींचा महसूल जमा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२२) :- साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या दसऱ्याचा मुहूर्त साधत नवीन वाहन खरेदीला नागरिकांनी पसंती दिली. शनिवार (दि. १) ते बुधवार (दि. ५) या पाच दिवसांच्या कालावधीत तब्बल १४,५६७ वाहनांची नोंदणी पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे झाली. यामध्ये सर्वाधिक ८,४४८ दुचाकी तर, ४,२९३ चारचाकी वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यानंतर मालवाहतूक आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या ट्रॅक्टरची नोंदणी करण्यात आली आहे. वाहनांच्या नोंदणीमुळे आरटीओ कार्यालयाच्या तिजोरीत कोट्यवधींची भर पडली आहे.
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा वाहन खरेदी वाढला असल्याचा अंदाज आहे. त्यात दुचाकी खरेदी करत असताना ग्राहक इलेक्ट्रिक दुचाकीला सर्वाधिक पसंती देत आहेत. कोरोनाकाळात वाहनखरेदीची संख्या रोडावली होती.
पिपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून २९ सप्टेंबरपासून चारचाकी वाहनांसाठी एमएच १४ जे अशी पसंती क्रमांकाची मालिका सुरू करण्यात आली होती. त्याला वाहनचालकांनी मोठा प्रतिसाद दिला. दि. २९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत तब्बल ८५ लाख ७० हजार ५०० रुपये तर लिलावाद्वारे २५ लाख ५८ हजार ६५५ असे एकूण एक कोटी ११ लाख २९ हजार १५५ रुपये येवढा महसूल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मिळाला. मागील वर्षापासून वाहन खरेदी सुरळीत सुरु झाली. त्यात यंदा वाहनखरेदीत मोठी वाढ झाल्याचे वाहतूक तज्ज्ञ सांगत आहेत.
आरटीओला ६९ कोटी ७९ लाखांचा महसूल
दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहनांच्या झालेल्या वाहन नोंदणीतून आरटीओ कार्यालयास तब्बल ६९ कोटी ७९ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. वाहनखरेदीमध्ये ग्राहकांनी ट्रॅक्टर, रुग्णवाहिका, आटिक्युलेटेड व्हेइकल, बस, कॅश व्हॅन, कन्स्ट्रक्शन इक्चिमेंट व्हेइलकल, डंपर, ई-रिक्षा, स्कुटर, ट्रेलर अशा विविध प्रकारांच्या वाहनांना पसंती दिली आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये यंदा दसऱ्याला वाहन नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महसूलदेखील चांगला मिळाला आहे. – मनोज ओतारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड…
















