न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी स्मिता झगडे यांची राज्य शासनाने नियुक्ती केली होती. मात्र, राज्य शासनाने आदेशावर घूमजाव करत त्यांची पदोन्नती रद्द केली. याबाबत स्मिता झगडे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण मुंबई (मॅट) मध्ये दाद मागितली आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची १३ सप्टेंबरला बदली झाली. त्यांच्या जागेवर महापालिकेमध्ये उपायुक्त असलेल्या स्मिता झगडे यांची पदोन्नतीने अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. ढाकणे यांची बदली झाल्यानंतर दहा दिवस स्मिता झगडे यांना महापालिकेत रुजू करून घेतले नाही. २२ सप्टेंबरला राज्य शासनाने आपल्या आदेशावर घूमजाव करत स्मिता झगडे यांची पदोन्नती रद्द केली. तर प्रदीप जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. प्रदीप जांभळे यांनी दुसऱ्या दिवशी तातडीने येत आपला पदभार स्वीकारला.
दरम्यान झगडे यांनी मॅटमध्ये दाद मागितल्याने राज्य शासन, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि प्रदीप जांभळे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. त्याची एक सुनावणी झाली असून दोन्ही प्रतिवादींना आपले म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे. पुढील सुनावणी उद्या ११ ऑक्टोबरला होणार आहे.
















