न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२२) :- पोलीस ठाण्यांच्या आवारात धूळ खात पडलेल्या वाहनांचा प्रश्न वारंवार ऐरणीवर येत आहे. चिंचवड पोलिसांनी अशा १९० वाहन मालकांचा शोध घेतला असून त्यांनी पुढील १५ दिवसांत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वाहने घेऊन जावीत, असे आवाहन केले आहे. चिंचवड पोलिसांनी परंदवडी येथील राम उदावंत यांच्या मदतीने हा उपक्रम राबवला.
चिंचवड पोलीस ठाण्याच्या आवारात ३०० पेक्षा अधिक वाहने वर्षानुवर्षे धूळ खात पडलेली आहेत. न्यायालयीन प्रक्रिया आणि विविध जुन्या गुन्ह्यातील वाहनांचे मालक मिळून येत नसल्याने पोलीस ठाण्यातील ही अडगळ दिवसेंदिवस वाढत आहे. ती कमी करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. शोध लागलेल्या वाहनांची यादी पोलीस ठाण्यात लावलेली आहे.
आवश्यक कागदपत्रे पोलीस ठाण्यात सादर करुन आपले वाहन १५ दिवसांच्या आत घेऊन जावे. दिलेल्या मुदतीत वाहन मालकांनी वाहने ताब्यात घेतली नाहीत तर ती वाहने बेवारस असल्याचे ग्राह्य धरून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयीन आदेशानुसार अशा वाहनांचा लिलाव करुन त्याची रक्कम सरकारी तिजोरीत भरण्यात येईल.
– कृष्णदेव खराडे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक…
















