- संभाव्य खर्चाच्या अचूक नियोजनासाठी आयुक्तांचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांमार्फत केल्या जाणाऱ्या भांडवली, महसुली तसेच किरकोळ दुरुस्ती कामांची सद्य:स्थितीतील देणी आणि भविष्यातील देणी याबाबत अचूक माहिती प्राप्त होत नाही. त्यामुळे संभाव्य खर्चाचे अचूक नियोजन होत नाही, ही बाब लक्षात घेऊन भांडवली, महसुली किरकोळ दुरुस्ती कामांचे आणि वस्तू व सेवा पुरवठादार यांचे कार्यारंभ आदेश यापुढे संगणक प्रणालीतून तयार करण्याचे आदेश पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत.
पालिकेच्या विविध विभागांमार्फत भांडवली, महसुली तसेच किरकोळ दुरुस्ती कामांचे आणि वस्तू व सेवा पुरवठादार यांचे कार्यारंभ खर्चाच्या अचूक नियोजनासाठी आदेश जारी केले जातात. परंतु, ही कामे सुरू असताना सद्य:स्थितीतील देणी आणि भविष्यातील देणी याबाबत अचूक माहिती शक्य होत नाही. महापालिकेची जी देणी आहेत त्याबाबतची अचूक माहिती मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी भांडवली, महसुली तसेच किरकोळ दुरुस्ती कामांचे आणि वस्तू व सेवा पुरवठादार यांचे कार्य आदेश आता संगणक प्रणालीतूनच तयार केले जाणार आहेत.
कार्य आदेश संगणक प्रणालीतून तयार करण्यासाठी या प्रणालीमध्ये आवश्यक ती सुधारणा सात दिवसांच्या आत माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत करून घेण्यात यावी. आपल्या विभागाशी संबंधित असलेल्या देण्यांबाबत संपूर्ण माहिती अद्ययावत ठेवण्यात यावी. या परिपत्रकाची नोंद सर्व संबंधित विभागांनी घ्यावी आणि कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे.
















