न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२२) :- सालाबाद प्रमाणे गेली पाच वर्षे दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांच्या स्मृतिदिना निमित्त गडकिल्ले आणि क्रांतीकारक या दोनही क्षेत्रात काम करणार्या मान्यवरांना अनुक्रमे “दुर्गमहर्षी दुर्गपाईक” आणि “दुर्गमहर्षी क्रांतिपाईक” या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांनी ३००० हून अधिक गडकिल्ल्यांवर अध्ययन करून, प्रत्यक्ष भेटी देऊन त्या प्रत्येक किल्ल्याचा इतिहास सर्वांसाठी उजेडात आणण्याचे महान कार्य केले. त्यांच्या या कार्याप्रती निष्ठा बाळगणार्या अभ्यासकास “दुर्गमहर्षी दुर्गपाईक पुरस्कार ” देऊन गौरविण्यात येते, तर ज्या क्रांतीकारकांनी भारताच्या स्वातंत्र्य समरात आपल्या प्राणांची आहुती देत ज्ञात आणि अज्ञात अशा ९०० हून अधिक क्रांतीकारकांचे जीवनचरित्र उजेडात आणले आहे. हे करत असताना दुर्गमहर्षींनी त्या क्रांतिकारकांच्या कुटुंबियांना प्रत्यक्ष भेटुन त्यांच्या जीवनातील अनेक अप्रकाशित पेलूंना सर्वांसमोर आणले. या कार्यात योगदान देणार्या अभ्यासकांना “दुर्गमहर्षी क्रांतिपाईक पुरस्कार”देऊन गौरविण्यात येते.
गत वर्षापर्यंत दुर्गपाईक पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या अभ्यासकांमधे इतिहास अभ्यासक गिरीषभाई टकले, सतिश अक्कलकोट, आप्पा परब आणि मिलिंद क्षिरसागर यांना प्रदान करण्यात आला. तर अॅड. राज कुलकर्णी, राजस्थान पुरातत्व विभागाचे प्रमुख डाॅ. महेन खडगावत, प्रा. बाबुराव गुरव आणि मराठवाडा क्रांतीसंग्रामाचे अभ्यासक प्रा. सतिश कदम सर यांना अनुक्रमे क्रांतिपाईक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
सन २०२२ च्या पुरस्कारार्थींची निवड दुर्गमहर्षी प्रमोद मांडे पुरस्कार समितीमार्फत नुकतीच करण्यात आली असून पुरस्कारार्थींच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा रविवार दि. १६ आॅक्टोबर २०२२ रोजी “स्वरभास्कर पं. भिमसेन जोशी सभागृह औंध येथे सकाळी १०:३० वा. “दुर्गमहर्षी प्रमोद मांडे पुरस्कार” प्रदान करण्यात येणार आहेत. यंदा जेष्ठ दुर्गअभ्यासक ऋषिकेश यादव सर “दुर्गमहर्षी दुर्गपाईक पुरस्कार”देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ऋषिकेश यादव हे उत्तम गिर्यारोहक असून प्रस्त्रारोहन करणार्या हजारो तरूणांना प्रशिक्षण देण्याचे काम ते सन १९८१ पासून”यंग झिंगारो” या संस्थेमार्फत करत आले आहेत. महाराष्ट्रा बरोबरच पुर्वोत्तर भारतातील अनेक गडकिल्ले आणि हिमालयिन मोहिमांचे त्यांनी नेतृत्व केले असून भारतातील पहिल्या नागरी एव्हरेस्ट मोहिमेचे नेतृत्वही त्यांनी केलेले आहे. एक निष्ठावंत दुर्ग अभ्यासक म्हणून त्यांच्या केलेल्या कार्याप्रती त्यांना “दुर्गमहर्षी दुर्गपाईक पुरस्कार” देऊन गौरविण्यात येत आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रु १००००/- रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
तसेच “दुर्गमहर्षी क्रांतिपाईक पुरस्कारा”साठी यावर्षी प्रोफेसर चमनलाल यांची निवड करण्यात आली असून प्रो. चमनलाल हे स्वतः भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले जवाहरलाल नेहरु विश्वविद्यालय दिल्ली येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना थोर क्रांतीकारक वीर भगतसिंग यांच्या जीवनचरित्रावर त्यांनी आजवर सहा ग्रंथ लिहून प्रकाशित केले आहेत. वीर भगतसिंग यांची त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत जवळ असलेली डायरी देखिल नुकतीच प्रो.चमनलाल यांनी प्रसिद्ध केली आहे.या पुरस्काराचेही स्वरुप सन्मानचिन्ह,मानपत्र आणि रू १००००/- रोख असे आहे.
दुर्गमहर्षी प्रमोद मांडे स्मृति समिती मार्फत दिले जाणारे पुरस्कार देशपातळीवर कार्य करणार्या अभ्यासकांना दिले जातात. डाॅ.महेन खडगावत सर(राजस्थान) आणि प्रो.चमनलाल (दिल्ली) हे मान्यवर पुरस्कार्थी याच कृतीचे द्योतक आहेत. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांच्या विचारधारेला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि तरूणांनी इतिहास, गडकिल्ले,पुरातन वास्तुकला याकडे व्यापक स्वरुपात पाहण्यासाठी ज्या कृती करणे आवश्यक आहे त्यासाठी समिती कार्यरत आहे. दुर्गमहर्षींनी त्यांच्या हयातीत अशा अनेक युवा संघटनांना जन्म दिला.गडकिल्ले सेवा संस्था चिंचवड ही त्यातील सर्वात पहिली संघटना होय. वडवानल प्रतिष्ठान,शिवाजी ट्रेल,पुणे व्हेंचर्स त्याच बरोबर झुंझार शिलेदार समिती आणि गडवाट परिवाराचा ते अविभाज्य अंग झाले. लोकसेवा प्रतिष्ठान चे ते प्रमुख आधारस्तंभ होते. आमदार दिपक पायगुडे यांचे मार्गदर्शक, पाठीराखे आणि विधायक कार्यासाठी प्रेरणा देणारे प्रेरणाश्रोत होते. नेताजी सुभाषचंद्र सैनिकी विद्यालय उभे करण्यात दुर्गमहर्षींचा सहभाग महत्वपुर्ण होता. गडकिल्ले सेवा संस्था ही आजही दुर्गमहर्षींच्या कार्यास पुढे घेऊन जाण्यासाठी अविरत कार्य करते आहे.















