न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०२२) :- कर संकलन विभागाच्या लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत अधिसूचित केलेल्या १२ सेवांपैकी ७ सेवा या पूर्वीच ऑनलाईन केलेल्या आहेत. उर्वरित ५ सेवांपैकी मालमत्ता हस्तांतरण ही सेवा मंगळवार (दि. ११) पासून ऑनलाईन सुरु झाली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त या सेवांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. तसेच उर्वरित ४ सेवा या ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन करण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला. या ऑनलाईन सेवेच्या समारंभाबरोबरच नियमित व प्रामाणिक कर भरणाऱ्यांसाठी मालमत्ता कर थकबाकी नसल्याचा दाखला निःशुल्क करण्यात आला आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींच्या मालमत्तांना ३० जूनपूर्वी देय सवलतीचा लाभ आता संपूर्ण वर्षभर केला आहे.
चालू आर्थिक वर्षात नवीन आकारणी होणाऱ्या मालमत्ता कर सवलत योजनांपासून वंचित राहत होत्या. त्यांना देखील सवलत योजना लागू केली असल्याचे सहायक आयुक्त देशमुख यांनी सांगीतले. मालमत्ता कर थकबाकी नसल्याचा दाखलाही ऑनलाईन पद्धतीने काढण्याची सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी महापालिका दहा रुपये आकारणी करत होती. महापालिका वर्धापन दिनापासून नियमित व प्रामाणिक करदात्यांसाठी आपुलकी व विश्वास निर्माण व्हावा, यादृष्टीने दाखला निःशुल्क देण्यात येणार आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिका ही नेहमीच लोकाभिमुख सेवा देण्यासाठी अग्रेसर आहे. सामान्य जनतेला देण्यात येणाऱ्या सेवा या जास्तीत जास्त पारदर्शी पद्धतीने देण्याचा महापालिकेचा मानस असतो. या ध्येयाला अनुसरुन कर आकारणी व कर संकलन विभागाच्या सर्व सेवा या ऑनलाईन करण्याचा निर्धार केला आहे. मालमत्ता हस्तांतरण ही सेवा १०० टक्के ऑनलाईन सुरु आहे. उर्वरित सेवा या ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन होतील.
– मा. शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक…















