न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे मोठ्या संख्येने वाढत आहेत. मोकळ्या जागा, मैदाने, रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पत्राशेड उभारून बिनदिक्कतपणे व्यवसाय केला जात आहे. या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. ते वृत्त फुटल्याने महापालिका भवनात बुधवारी (दि. १२) माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. सणासुदीच्या काळात ही कारवाई न करण्याबाबत विनवणी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे करण्यात आली.
तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणावर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. त्यांच्या बदलीनंतर ही कारवाई मोहीम थंडावली आहे. कारवाई केलेल्या ठिकाणी पुन्हा अनधिकृत बांधकाम व पत्राशेड उभारून बिनदिक्कतपणे व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. त्यासंदर्भात जनसंवाद सभेत वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याची दखल घेऊन पुन्हा कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
गुरुवार (दि. १३) व शुक्रवार (दि. १४) असे दोन दिवस मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात येणार आहे. ती माहिती बाहेर फुटली. त्यामुळे ती कारवाई टाळण्यासाठी व्यावसायिकांनी माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना साकडे घातले. त्यामुळे त्यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले. पालिका भवनात बुधवारी (दि. १२) एकामागून एक माजी नगरसेवक दाखल झाले. त्यांनी आयुक्त कक्षाबाहेर गर्दी केली होती. खासगीत भेटून त्यांनी सणासुदीच्या काळात कारवाई करू नये, अशी विनंती आयुक्तांना केली. आता, आयुक्त कारवाई करणार की पुढे ढकलणार, याची उत्सुकता महापालिका वर्तुळात आहे.















