- गणवेश वाटप आणि शालेय साहित्य वाटपावर आयुक्तांची मोहोर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रतीक्षेनंतर गणवेश वाटपास प्रशासनाने सुरुवात केली आहे, तर शालेय साहित्य देण्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून आयुक्तांकडे प्रस्ताव पडून होता. अखेर महापालिका प्रशासनाने त्याची दखल घेतली असून ४१ हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शालेय साहित्याचे पैसे वर्ग करण्यात येणार आहेत.
शहरातील शाळा १३ जूनपासून सुरू झाल्या आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये तब्बल ४१,२३० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांना दरवर्षी महापालिकेच्या वतीने दोन शालेय गणवेश, एक पीटी गणवेश, एक स्वेटर, एक रेनकोट दिला जातो. तसेच शालेय साहित्यामध्ये वह्या, पुस्तके, बूट, प्रयोगवही असे साहित्य दिले जाते. यंदा शाळा सुरू होऊन तब्बल पाच महिने उलटले आहेत. त्यानंतर आता महापालिका प्रशासनाने गणवेश वाटपास सुरुवात केली आहे, तर शालेय साहित्याचे पैसे शाळेतील मुख्याध्यापकांच्या खात्यावर पाठवण्यात येणार आहेत.
त्यानंतर ते पालकांच्या खात्यावर पाठवण्यात येणार आहेत. सद्य:स्थितीत २३,५३० पालकांचे बँकेत खाते आहे, तर १७,७०० पालकांनी अद्याप बँकेत खाती उघडलेली नाहीत. पुढील आठवड्यात त्यांची खाती उघडण्यात येणार आहेत. त्यानंतर पैसे दिले जाणार आहेत. शाळा सुरू होऊन पाच महिने झाले, तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नव्हते. यामुळे प्रशासनावर पालकांनी नाराजी व्यक्त केली होती. ठेकेदारांकडून गणवेश आल्यानंतर प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात होती. अखेर प्रशासनाने गणवेश वाटपास सुरुवात केली आहे.
डीबीटीचा निर्णय झाला आहे. पालकांच्या बँक खात्यात शालेय साहित्याचे पैसे देण्यात येणार आहेत. सुमारे १७ हजार पालकांचे बँकेत खाते नाही. त्यामुळे एखाद्या बँकेशी बोलून कॅम्पचे आयोजन करून खाते काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
– संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग…