- पहिल्या वर्षी १३ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२२) :- महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेत नवीन चार अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून त्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संलग्नतेसाठीदेखील आवश्यक मागणी करण्यात आली आहे. तीन वर्षांत ३९ विद्यार्थ्यांना संधी. त्वचारोग, नेत्ररोग, उरोरोग, सामाजिक वैद्यकशास्त्र अशा चार अभ्यासक्रमांसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
हा वैद्यकीय अभ्यासक्रम पदव्युत्तर आहे. त्या अंतर्गत एकूण १३ जागांवर पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. त्यानंतर पुढील दोन वर्षे अनुक्रमे १३ या प्रमाणे एकूण ३९ विद्यार्थी तीन वर्षांमध्ये प्रवेश घेऊ शकणार आहेत. या चार अभ्यास क्रमांकावर मंजुरी देणारा राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचा शासन निर्णय वायसीएम रुग्णालय प्रशासनाला सोमवारी प्राप्त झाला आहे. तर, सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून या अभ्यासक्रमांसाठी मंजुरी मिळाली होती, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.
टप्पानिहाय अभ्यासक्रमांना मंजुरी…
यापूर्वी २०१९ मध्ये ७ अभ्यासक्रमांना मंजुरी मिळाली होती. त्यामध्ये भूलशास्त्र, विकृतीशास्त्र, मनोचिकित्सा शास्त्र, बालरोग विभाग, स्त्रीरोग शास्त्र, अस्थिरोग, कान-नाक-घसा शास्त्र आदी अभ्यासक्रमांना मंजुरी देण्यात आली. या अभ्यासक्रमांसाठी एकूण २४ जागा आहेत. २०२० मध्ये औषध वैद्यकशास्त्र आणि शल्यचिकित्सा या अभ्यासक्रमांना मंजुरी मिळाली. त्याच्या १२ जागा आहेत. त्यानंतर आता २०२२ मध्ये नवीन ४ अभ्यासक्रमांना मंजुरी मिळाली आहे.
सूक्ष्म जीवशास्त्र (मायक्रोबायलॉजी) आणि न्यायवैद्यक शास्त्र (फोरेन्सिक मेडिसीन) हे अभ्यासक्रम तसेच दंतरोग विभाग आणि इमर्जन्सी मेडिसीनसाठी प्रस्तावित आहे. नवीन अभ्यासक्रम आणि विभागांसाठी आवश्यक पदनिर्मिती करून त्याबाबतचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी पाठवावा लागणार आहे.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय व पदव्युत्तर संस्था.