न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२२) :- वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम संस्थेतील अतिदक्षता कक्षातील (आयसीयू) नादुरुस्त व्हेंटिलेटरच्या दुरुस्तीसाठी आवश्यक स्पेअर पार्ट खरेदी करण्यात येणार आहे. हे साहित्य निविदा न मागविता थेट पद्धतीने खरेदी केले जाणार आहे. त्यासाठी १३ लाख ३२ हजार रुपये खर्च होणार आहे.
यशवंतराव चव्हाण स्मृती वायसीएम रुग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटर नादुरुस्त आहेत. हे व्हेंटिलेटर दुरुस्तीसाठी आवश्यक स्पेअर पार्ट मिळण्याबाबत बायोमेडिकल इंजिनिअरिंग विभाग यांनी मागणी केली आहे.
व्हेंटिलेटर नादुरुस्त होणे, ही बाब गंभीर व रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणारी आहे. रुग्णांवरील उपचाराची गरज लक्षात घेऊन महापालिकेने मागील पुरवठादार श्री कन्स्ट्रक्शन यांना विचारणा केली. त्यांनी मागील मंजूर दराने हे स्पेअर पार्ट पुरवठा करण्याचे मान्य केले. त्यानुसार कोणतीही निविदा न मागवता थेट पद्धतीने हे स्पेअर पार्ट पुरवठा केले आहेत. यासाठी १३ लाख ३२ हजार रुपये खर्च होणार आहे.


















