- पालिका प्रशासन मोठ्या अपघाताच्या प्रतीक्षेत?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२२) :- निगडी ते तळवडे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने त्यात वाहन आदळून अपघाताच्या घटनाही घडत आहेत.
तळवडे आयटी पार्कसह चाकण, तळेगाव एमआयडीसी व श्री क्षेत्र देहूलाही निगडी ते तळवडे हाच मार्ग जात असल्याने इथे नेहमीच वाहनांची वर्दळ असते. अवजड वाहनांसह इतर वाहनांची संख्याही अधिक असते. मात्र, या मार्गावरील खड्ड्यांमुळे चालक अक्षरशः हैराण झाले आहेत. दुर्गानगर चौक, त्रिवेणीनगर चौक, गणेशनगर चौक, ज्योतिबा मंदिराजवळील रस्ता, टॉवर लाइनकडे जाणारा रस्ता आदी ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.
रात्रीच्या वेळी या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. खड्ड्यातील खडी रस्त्यावर पसरल्याने वाहने घसरण्याचेही प्रकार वारंवार घडत आहेत.
यामुळे, वाहनचालकांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. महापालिका रस्ते दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करून अपघाताची प्रतीक्षा करतेय का?
या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
















