- पालिकेच्या जनसंवाद सभेत नेहमीच्याच समस्यांचा भडीमार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ नोव्हेंबर २०२२) :- महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज झालेल्या जनसंवाद सभेत ८८ नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे १७, ११, ७, ६, ९, १४, १५ आणि ९ इतक्या नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या आशा आणि आकांक्षांचे प्रतिबिंब महापालिकेच्या ध्येय धोरणे, विविध निर्णयात दिसावे तसेच शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी आणि तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते.
अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, समाज विकास विभागाचे उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, आरोग्य विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर, भूमी जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांनी भूषवले. तसेच क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, सीताराम बहुरे, शीतल वाकडे, विजयकुमार थोरात हे उपस्थित होते. क्षेत्रीय कार्यालयांतील जनसंवाद सभेत स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना आदी विभागांचे कार्यकारी अभियंता, उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन या विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम वेगाने करावे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, रस्त्यालगत असलेल्या वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटाव्यात, रस्त्याच्या कडेला पदपथांवर उभारण्यात आलेले अतिक्रमण काढावेत, त्याठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी, पाणीपुरवठा पुरेशा दाबाने करावा, कचरा संकलित करण्यासाठी येणा-या घंटा गाड्या नियमित येतील याची दक्षता घ्यावी, उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर तसेच रस्त्यावर कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई करावी, रस्त्यांचे कामे तातडीने पूर्ण करावीत, पदपथांवरील राडारोडा उचलावा, पदपथांवरील निघालेले पेव्हिंग ब्लॉक तात्काळ बसवावेत अशा सूचना व तक्रारी आज झालेल्या जनसंवाद सभेमध्ये नागरिकांनी मांडल्या.















