न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ नोव्हेंबर २०२२) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संपूर्ण संविधान समितीने २ वर्ष ११ महिने १७ दिवस मोठ्या अथक प्रयत्नाने जगातील सर्वात मोठे लिखित संविधान या देशाला दिले. संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समान अधिकार दिले. ज्यांनी ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्व शहिदांच्या स्वप्नाला संविधानाच्या माध्यमातून साकार करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जनसामान्य लोकांपर्यंत हे महान भारतीय संविधान पोहचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात संविधान दिन साजरा करण्यात येतो. या संविधान दिनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना आपले हक्क, अधिकार, कर्तव्ये भारतीय संविधान याबद्दल प्रबोधन केले जाते व पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी ही एक विचारांची पर्वणी असते. संविधान दिनाच्या प्रबोधन पर्व कार्यक्रमामध्ये शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवतात.
२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन असतो. या कार्यक्रमासाठी अगदी थोडाच अवधी शिल्लक राहिलेला आहे. शहरातील विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पक्ष संघटना व विविध मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने संविधान दिन कार्यक्रमाची नियोजन बैठक आयोजित करावी, अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने महानगपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे.


















