- मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी केंद्राचीही सुविधा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ नोव्हेंबर २०२२) :- इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) ठेवण्यासाठी हक्काची जागा आवश्यक असल्याने रावेत येथील जागा देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. ही जागा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनासुद्धा पसंत पडल्याने या जागेवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोगाची ईव्हीएम ठेवण्यासाठी जिल्ह्यात अत्याधुनिक असे गोदाम उभारले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
रावेत येथील ३ हेक्टर २९ आर आहे. इतक्या जागेत हे गोदाम उभारले जाणार असून, या ठिकाणी सुमारे ७५ हजार ईव्हीएम ठेवण्याबरोबरच काही मतदारसंघांसाठी मतमोजणी केंद्रसुद्धा असणार आहे. ईव्हीएम ठेवण्यासाठी भोसरी येथील वखार महामंडळाच्या गोदामाचा वापर केला जातो. गोदाम हे धान्य साठवणुकीकरिता बांधलेले आहे. वखार महामंडळासाठीसुद्धा धान्याची साठवणूक करण्यासाठी गोदाम मिळणे आवश्यक होते. या सर्व पार्श्वभूमीवर मतदान यंत्रे ठेवण्यासाठी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला
पुणे जिल्ह्यात २१ विधानसभा मतदारसंघ आहेत. तर, मतदान केंद्रांची संख्या सुमारे आठ हजारांपेक्षा अधिक आहे. ईव्हीएममध्ये कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट यांसह व्हीव्हीपॅडचा समावेश होतो. त्यामुळे ही मतदान यंत्रे ठेवण्यासाठी हक्काची जागा मिळणे आवश्यक होते. हक्काची जागा मिळाली, तर ईव्हीएम सुरक्षित राहतील. त्यादृष्टीने गोदामाची उभारणी करणे शक्य होणार आहे.
















