- थकबाकीदारांच्या घरात घुसून कार, टीव्ही जंगम मालमत्ता जप्त करणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ नोव्हेंबर २०२२) :- शहरातील थकबाकी मिळकतधारकांच्या तब्बल २०० मिळकतींना सील ठोकण्यात आले आहे. कारवाईनंतरही थकबाकीसह संपूर्ण बिल न भरणाऱ्या मिळकती जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे; तसेच नागरिक राहत असलेल्या घरातील टीव्ही व कार या वस्तू जप्त केल्या जाणार आहेत.
शहरातील ५० हजार रुपयांपुढे थकबाकी असणाऱ्या २६ हजार ७६० मिळकती आहेत. पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या व्यावसायिक १ हजार ३६१ तर मिळकती आहेत. तर, एकदाही कर न भरलेल्या ३ हजार ८५० मिळकती आहेत. अशा एकूण ३१ हजार ९७१ मिळकतधारकांना करसंकलन विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. नोटीस दिल्यानंतरही मुदतीमध्ये बिल न भरलेल्या बिगरनिवासी व निवासी मिळकती सील करण्यात येत आहेत.
एक लाखाच्यावर थकबाकी असलेल्या मिळकतीची संख्या ८ हजार ७९१ आहे. त्यापैकी ६९१ मिळकतींना जप्तीचे पत्र पाठविली आहेत. पत्र मिळताच ४८३ नागरिकांनी कर भरला आहे. ज्या निवासी मिळकती म्हणजे घरे, सदनिका व बंगले बंद आहेत त्या सील करण्याचा निर्णय घेतला आहे. याची कार्यवाही याच आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे. ज्या निवासी मिळकतीमध्ये नागरिक वास्तव्य करतात, अशा थकबाकीदारांकडे ५ किंवा १० वर्षांपेक्षा अधिक कालावधीत थकबाकी आहे. अशा निवासी मिळकतधारकांची जंगम मालमत्ता म्हणजे कार, टीव्ही जप्त करण्यात येणार आहेत. नागरिकांनी तत्काळ कर भरून जप्ती टाळावी, असे आवाहन करसंकलन विभागाने केले आहे.