- अंदाजपत्रकीय आकडेवारी लेखा विभागाकडे सादर करा; आयुक्तांच्या विभागांना सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२२) :- महापालिकेच्या वतीने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक तयार करण्यास सुरूवात करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व विभागांनी त्यांची अंदाजपत्रकीय आकडेवारी १५ नोव्हेंबरपर्यंत लेखा विभागाकडे सादर करावी. सादर केलेल्या आकडेवारीची योग्य छाननी व दुरुस्ती करून अचूक अंदाजपत्रक तयार करावे, असे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.
फेब्रुवारी २०२३ मध्ये पिंपरी- चिंचवड महापालिकेचे ४० वे अंदाजपत्रक सादर करण्यात येणार आहे. तर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे हे पहिलेच अंदाजपत्रक असेल. गतवर्षी तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी सात हजार ११२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. मागील वर्षीच्या अंदाजपत्रकावर कोरोनाचा प्रभाव दिसला होता. त्यामुळे मोठे प्रकल्प व नवीन योजनांना कात्री लावली होती. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे यंदा नागरिकांना महापालिकेच्या बजेटमधून कोणते मोठे प्रकल्प मिळणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
सुचविलेल्या कामांचा फायदाही स्पष्ट करावा..
२०२३-२४ या वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्यास सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी प्रत्येक विभागाकडून महसुली व भांडवली या लेखाशिर्षाखाली योग्य ती रक्कम भरावी. अंदाजपत्रकामध्ये १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२२ या काळात एखाद्या लेखाशिर्षावर रक्कम वर्ग केली असेल त्याचा स्पष्ट उल्लेख करावा. २०२२-२३ च्या सुधारित अंदाजपत्रकामध्ये जास्त रक्कम मान्य होईल, हे अपेक्षित धरून कोणतेही काम सुरू करू नये. भांडवली नवीन कामे सुचवताना त्या कामाचा काय फायदा असेल हेदेखील सूचवावे, असे आयुक्त सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे.
















