- फोन, वीज अन पाणीपट्टी भरण्याचीदेखील सेवा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२२) :- रेशन दुकानांमध्ये महा ई सेवा केंद्राप्रमाणे फोन, वीज अन् पाणीपट्टी भरण्याची सेवा नागरिकांना मिळणार आहे. ‘मल्टीपर्पज’ सेवा सुरू करण्यासाठी राज्य शासनाने मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमासाठी पुरवठा विभागाने तयारी सुरू केली आहे. ग्रामीण व शहरी भागासाठी हे केंद्र असेल. नागरिकांना सर्वव्यापी सुविधा मिळण्यासाठी व रेशन दुकानदारांना काही प्रमाणात उत्पन्नाचे साधन मिळण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
फोनबिल भरणे, वीजबिल भरणे, पाणीपट्टी भरण्यासाठी रेशन दुकानात सुविधा मिळणार आहेत. यांसह आगामी काळात मनी एक्स्चेंज व इतर सुविधाही मिळू शकतील. रेशन दुकानात सेवा केंद्र सुरु करण्यासाठी पुरवठा विभागाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. सेवा केंद्र चालवायचे कसे, याबाबत दुकानदारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात काही दुकानादारांना प्रशिक्षण देऊन हे मल्टीपर्पज सेवा केंद्र सुरु करण्यात येणार आहेत.
पुरवठा विभागाकडून या उपक्रमासाठी रेशन दुकानांची नोंदणी करण्यात येत आहे. त्यांचे ऑनलाइन आयडी तयार झाले आहेत. शहरातील रेशन दुकानांनाही या उपक्रमात नोंदणी करण्यात येणार आहे.
शासन आदेशानुसार उपक्रम राबविण्यात येणार आहे. ‘मल्टिपर्पज’ सेवाकेंद्र सुरु करण्याची तयारी सुरु आहे. त्यासाठी काही रेशन दुकानदारांनीही तयारी दर्शवली आहे. पहिल्या टप्प्यात त्यांच्या दुकानांची नोंदणी करून त्यांचे ऑनलाइन आयडी तयार करण्यात येणार आहेत.
– दिनेश तावरे, नायब तहसीलदार, पुरवठा विभाग…
















