न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिन व संविधान दिवस साजरा करण्यात येणार असून या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात शहरातील विविध संघटनांसमवेत दि. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजता पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणे तसेच त्यानुषंगिक चर्चा या बैठकीत होणार असून शहरातील संघटनांनी याची नोंद घेऊन बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
दि. २८ नोव्हेंबर २०२२ रोजी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचा स्मृतीदिन असून त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने दरवर्षी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. भारतीय संविधानाचे घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी स्थापन झालेल्या मसुदा समितीने सादर केलेला अंतिम मसुदा दि. २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी संविधान सभेने स्विकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशभरात संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. नागरिकांना भारतीय संविधानाची ओळख व्हावी आणि भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी याकरिता संविधान दिवस महापालिकेच्या वतीने साजरा करण्यात येतो.
त्यादृष्टीने विविध संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा करून कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत मधुकर पवळे सभागृहात दुपारी ४ वाजता नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी विविध संस्था तसेच संघटनांच्या प्रतिनिधींनी या बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
















