न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते व पिंपरी चिंचवड मिळकत धारक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, मराठा युवक महासंघाचे सक्रिय पदाधिकारी उदयसिंह पाटील यांची पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी या नोंदणीकृत पक्षाच्या शहर प्रवक्ता पदी निवड करण्यात आली आहे. ही निवड परिवर्तन विकास आघाडीच्या अध्यक्षा छाया सोळंके जगदाळे यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे. आघाडीचे उपाध्यक्ष सोमनाथ मंडलिक यांच्या हस्ते पाटील यांना निवडीचे नुकताच पत्र देण्यात आले आहे.
पाटील यांनी पिंपरी चिंचवड मिळकतधारक संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने करत मिळकत धारकांच्या समस्या सरकार व महापालिका प्रशासनापुढे मांडल्या आहेत. शहरातील विवीध प्रश्नांना मागील २६ वर्षांपासून हात घालत अनेक आंदोलने केली आहेत. तसेच सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांच्या निराकरणासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रश्नांची त्यांना पुरेपूर जाण असून त्या सोडविण्याकामी यापूर्वी देखील त्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केलेला आहे. यात प्रामुख्याने समाविष्ट गावातील अन्यायकारक कर माफी, विकासकामे, अनधिकृत बांधकामे, शास्तीकर इत्यादींचा समावेश आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवक शहराध्यक्षाची धुरा समर्थपणे व जबाबदारीने त्यांनी पार पाडलेली आहे. सामाजिक क्षेत्रातील व्यापक अनुभव व अभ्यासूवृत्तीचा उपयोग पक्ष संघटना वाढीसाठी तसेच पक्षाची सर्वव्यापी समाजहित व लोकहितवादी भूमिका समाजासमोर प्रसिद्ध माध्यमासमोर मांडताना त्यांचा अनुभव पक्षाच्या व जनकल्याणाच्या सत्कारणी लागेल याचा पूर्ण विश्वास असल्याचे संस्थापक अध्यक्ष छाया सोळंके-जगदाळे यांनी व्यक्त करीत त्यांचे निवडीबद्दल अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
सध्या देशाचे व राज्याचे राजकारण अस्थिरतेकडे चालले आहे. अशा वेळी संविधान, कायदा व लोकशाही बळकट ठेवणे गरजेचे आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरामध्ये सामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी दबावगट व मतदारांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. भ्रष्ट राजकारणी, अधिकारी व ठेकेदार यांच्या अभद्र युतीच्या विरोधात जनजागृती अभियान राबवणे हे देखील तितकेच लोकहिताचे ठरेल. यासाठी पिंपरी-चिंचवड परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून समस्यावर भेदक मारा करण्याचे काम माझ्याकडून केले जाईल. शहरातील परिवर्तनाची आवश्यकता पाहता छायाताई सोळंके-जगदाळे यांनी परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून उचललेले पाऊल निश्चितच शहरात परिवर्तनाची नांदी ठरेल व पक्ष येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीला सर्व ताकदीने सामोरे जाईल.
– उदयसिंह पाटील, नवनियुक्त प्रवक्ता – पिंपरी-चिंचवड परिवर्तन विकास आघाडी…