- पहिल्या टप्प्यात वाकड बायपास ते सांगवी पुलाचे काम हाती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरातील मुळा नदीचा पुनरुज्जीवन प्रकल्प पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका संयुक्तपणे राबवत आहे. हे काम पुणे महापालिकेच्या वतीने सुरू आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका ७५० कोटी रुपये देणार आहे. या खर्चासाठी महापालिकेने २०० कोटी रुपये कर्जरोखे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि. १४) मंजूर केला.
पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीच्या खर्चास आयुक्तांनी ३१ ऑगस्ट २०१५ रोजी मान्यता दिली आहे. या कामाची निविदा प्रक्रियाही सुरू झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड ते बोपखेल या मुळा नदीच्या १४.२० किलोमीटरसाठी सुमारे ७५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान. पिंपरी महापालिकेने पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यासाठी कर्जरोखे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
नदी सुधार प्रकल्पामध्ये जागेच्या उपलब्धतेनुसार पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने काम केले जाणार आहे. अनावश्यक बंधारे काढण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात वाकड बायपास ते सांगवी पूल या ८.८० किलोमीटर लांबीचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यासाठी ३२१ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. दुसया टप्प्यात सांगवी पूल ते बोपखेल या ६.२० किलोमीटर अंतराच्या लांबीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यात दापोडीपासून बोपखेलपर्यंत सीएमई या संरक्षण विभागाच्या हद्दीचा समावेश आहे.
दरवर्षी अर्थसंकल्पात आवर्जून कर्जरोख्यांची तरतूद केली जाते. त्यानुसार महापालिका लेखा विभागामार्फत कर्जरोखे उभारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. पहिल्या टप्प्यात महापालिका २०० कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावास स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त सिंह यांनी मान्यता दिली. स्थायी समिती व महासभेची मान्यता दिल्यानंतर हा कर्जरोखे उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. शासनाच्या मान्यतेनंतर पुढील कार्यवाही होणार आहे.















