- कर्णकर्कश्श आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना पोलिसांचा दणका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२२) :- कर्णकर्कश्श आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सरवर कारवाई करण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी (दि. ११) रोजी विशेष मोहीम राबवून १९५ बुलेटस्वारांवर कारवाई केली. सायलेन्सर बदलून कानठळ्या बसविणारा आवाज काढणाऱ्या या वाहन चालकांवर एक लाख २९ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून ही कारवाई झाली.
शहरातील ध्वनिप्रदूषण नियंत्रणात राहण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडूनही फटाके वाजविणे, डीजे यावर निर्बंध लागू केले आहेत. मात्र, सायलेन्सरचा फटाका वाजविण्याचे प्रकार बुलेटस्वारांकडून सुरू आहेत. अशा बेशिस्त बुलेटस्वारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. दिवाळीच्या काळातही अशा बुलेटस्वारांवर मोठी कारवाई केली होती. त्यानंतर पुन्हा विशेष मोहीम राबवून बुलेटस्वारांना पोलिसांनी दणका दिला.
दुचाकी, तसेच चारचाकी वाहनांची सजावट करताना, काही जणांकडून वाहनांच्या मूळ स्वरूपात बदल केला जातो. यासाठी काही पार्टस बदलून फेरफार केला जातो. त्यामुळे वाहनाच्या मूळ रचनेत बदल होतो. परिणामी, ध्वनी व वायुप्रदूषण होऊ शकते. त्यामुळे वाहनाच्या मूळ रचनेत बदल करणे हा कायद्याने गुन्हा ठरतो. अशा वाहन चालकांवर कारवाई केली जाते.
वाहन चालकांनी नियमांचे पालन केले पाहिजे. नियमाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येत आहे. सायलेन्सर बदलून काही बुलेटस्वार फटाक्यासारखा कर्णकर्कश्श आवाज करतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना त्रास होतो. अपघाताचा धोका असतो. त्यामुळे असे प्रकार टाळावेत.
– सतीश माने, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड…















