- रुग्णालयातील उपकरणांची होणार नियमित तपासणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२२) :- महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आग लागू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने अॅक्शन प्लॅन आखला आहे. त्यानुसार, पालिकेच्या रुग्णालयामधील उपकरणांची नियमित तपासणी करण्यात येईल. तसेच, ‘मॉकड्रील’ घेऊन कर्मचाऱ्यांना सावध करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णालयात आग लागण्याच्या घटना कमी होतील, असा दावा प्रशासनाने केला आहे.
महापालिकेच्या तालेरा रुग्णालयामध्ये २१ मे २०२२ ला आग लागली होती. रुग्णालयामध्ये सकाळपासून जनरेटर सुरू असल्याने बॅटऱ्या तापून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला होता. त्यानंतर आगीची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना झाली होती.
पालिका रुग्णालयांमधील वायरींचे जाळे, विद्युत वायरींची स्थिती, आर्थिंग तपासणी, स्विच गिअर, कंट्रोल पॅनल याची पडताळणी करण्यात येईल. यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयातील विद्युत व अग्रिशामक उपकरणांची तांत्रिक कर्मचारी यांच्या समक्ष पडताळणी करावी होणार आहे. तसेच त्याचा तपासणी अहवाल विद्युत विभागाचे सहशहर अभियंता यांच्याकडे द्यावा लागणार आहे.
रुग्णालयामध्ये आग लागल्यावर काय उपाययोजना कराव्यात, याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी रुग्णालयामध्ये आग लागल्यास काय करावे व काय करू नये, यासाठी मॉकड्रील होईल. या माध्यमातून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्या माध्यमातून रुग्णालयातील आग लागण्याच्या घटना आटोक्यात आणण्यास मदत होणार असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.